मल्हारराव होळकर[1, 2, 3]

Male


Personal Information    |    Sources    |    All

  • Name मल्हारराव होळकर 
    Gender Male 
    Association कंठाजी कदमबांडे (Relationship: मल्हारराव होळकर कंठाजी कदमबांडे यांच्या सेवेत होता.) 
    Person ID I587  Maratha Empire
    Last Modified 7 May 2022 

  • Sources

    1. [S26]
      केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/., https://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-50/12475-2013-03-13-06-09-23.
      मल्हारराव होळकर (इंदूर पहा)- इंदूर संस्थानचा संस्थापक. मल्हारराव होळकर हा जातीनें धनगर असून, नीरेकांठच्या होळ खेडयाचा (पुणें जिल्हा) रहाणारा होता. मल्हाररावाचा जन्म १६९४ सालीं झाला. लहानपणीं बाप वारल्यावर तो खानदेशांत आपल्या मामाच्या गांवी (तळोदें) राहिला. त्याची बायको गोतमा ही त्याची मामेबहीण होती.

      पुढें (१७२५) माळव्यांतील चौथ व सरदेशमुखी गोळा करण्याचें काम पवार, शिंदें यांच्याबराबर मल्हाररावाकडेहि बाजीरावानें सोंपविलें; व फौजेच्या खर्चासाठीं, त्या मुलुखाच्या मोकासाबाबींत थोडीशी रक्कम तोडून दिली. यानंतर १७३१ (माळवा), ३२ (तिरला), ३५ (आग्रा व गुजराथ), ३६ (अंतर्वेद, दिल्‍ली), ३८ (भोपाळ), ३९ (कोंकण, वसई) या सालच्या पेशव्यांनीं केलेल्या मोहिमांत मल्हारराव हजर होता. यांपैकीं कांहीं स्वाऱ्या त्यानें स्वतः केल्या. बहुतेक माळवा सर झाल्यावर इतर सरदारांबरोबर मल्हाररावास पेशव्यांनीं माळव्यांतील ८२ परगणे जहागीर दिले. यापूर्वीच रेवाकांठचा बराचसा प्रांत मल्हाररावानें जिंकला होता. त्यामुळें त्यानें आपलें मुख्य ठाणें महेश्वरास केलें. जयपूरच्या गादीबद्दल तंटे लागून मल्हाररावानें माघोसिंगाचा पक्ष घेऊन त्यास गादीवर बसविलें व त्याबद्दल ६४ लाख खंडणी आणि रामपुरा, भानपुरा, टोंग वगैरें प्रांत मिळविला. शाहूच्या मृत्युनंतर पेशव्यांनीं जी माळव्याची व्यवस्था केली तींत माळव्याच्या एकंदर १॥ कोट वसुलापैकीं ७४॥ लक्षांचा प्रांत मल्हाररवास दिला. पुढें मल्हाररावानें रोहिल्यांविरुद्ध अयोध्येच्या सफदरजंगास मदत केली (१७५१), पेशव्यांच्या आज्ञेवरून वजीर गाजीउद्दीन यास दक्षिणेंत आणिलें (१७५२). गाजीच्या मीर शहाबुद्दीन नांवाच्या मुलास जाटांविरुद्ध मदत करून, जाटांच्या मदतीस आलेल्या दिल्‍लीच्या बादशहाचा पराभव केला (१७५४). व राघोबादादा पेशव्यांच्या उत्तरेकडील स्वाऱ्यांत थोडा फार भाग घेतला (१७५६-५७). मात्र या वेळेपासूनच पेशवे-सरकारविरुद्ध मल्हाररावानें नजीबाखानास अंतस्थपणें मदत देण्याचें सुरू केले. दुसऱ्या अलमगिरास हिंदुस्थानांतील उलाढालीच्या वेळी प्रतिकार करण्याच्या कामीं मल्हाररावानें थोडाफार भाग घेतला हाता. पहिल्यापासून मल्हारावा आपलें अंग राखून काम करणारा होता. आपला फायदा ज्यांत नाहीं त्यांत तो सहसा पडत नसे. शिंदू आपल्याकडून वरचढ होऊं लागले हें पाहतांच यानें त्यांच्या विरुद्ध खटपटी सुरू केल्या; एवढेंच नाहीं तर जरूर त्यावेळीं त्यांनां मदतहि केली नाहीं. त्याचप्रमाणें यानें नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीत मध्यवर्ती सरकारास जवळ जवळ धाब्यावर बसविलें. स्वतःकडे तुंबलेल्या हिशेबाची दाद लागूं दिली नाहीं. बहुतेक पेशव्यांच्या स्वाऱ्यांत कांहीं तरी खेंगटें काढून जेणे करून आपल्यावाचून अडेल अशा तो अडचणीं आणूं लागला. शिंद्यांच्या विरुद्ध त्यांच्या शत्रूंस आंतून मदत केली, नजीबखानासारख्या मराठयांच्या कट्टया शत्रूस ''पेशव्यांचीं धोत्रें बडवावीं लागतील यासाठीं'' खळी म्हणून व पेशवे ''नजीब हा बेमान हरामखोर, अर्धा अब्दाली आहे'' असें सांगत असतांहि त्याला मुद्दाम शेवटपर्यंत राखून ठेवला, आणि फुसक्या सबबी काढून पानपताच्या प्रसंगीं भाऊसाहेबांनां जास्ती अडचणींत आणून शेवटच्या वेळीं रणांतून पाय काढला. मात्र थोरला बाजीराव किंवा थोरला माधवराव यांच्यासारख्या कडक पेशव्यांपुढें त्याचें कांहीं चालत नसे.

      यानंतर राक्षसभुवनाच्या लढाईंत (१७६३), जाटानें दिल्‍लीस घातलेल्या वेढयांत (१७६४), व राघोबादादाच्या उत्तरेकडील मोहिमेंत (१७६६) मल्हाररावानें भाग घेतला होता. शेवटच्या मोहिमेंत तो ७२ वर्षांचा होऊन अलमपूर येथें मरण पावला (१७६६ मे). त्याला खंडेराव म्हणून एक मुलगा होता, तो कुंभेरीच्या लढाईंत मारला गेला. त्याचीच बायको अहल्याबाई होय. मल्हारराव हा सुजाउद्दौल्याच्या मदतीस इंग्रजांविरुद्ध गेला असतां (१७६५) त्याचा मोड झाला होता, म्हणून त्यानें आपल्या मृत्यूसमयीं दादासाहेब पेशव्यांनां इंगजांचें पारिपत्य करण्याबद्दल सांगितले होतें असें म्हणतात. (नाडकर्णी-होळकरराज्याचें सामान्य वर्णन; डफ; होळकर कैफि; पत्रें - यादि; भाऊ - बखर; कीन - फॉल ऑफ दि मोंगल एंपायर.)


    2. [S39]
      मराठी विश्वकोश, (मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ), https://vishwakosh.marathi.gov.in/., https://vishwakosh.marathi.gov.in/20243/.
      होळकर, मल्हारराव : (१६ मार्च १६९३–२० मे १७६६). मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार सेनानी व इंदूर संस्थानचे संस्थापक. त्यांचा जन्म होळ (जेजुरीजवळ) येथे धनगर घराण्यात झाला. वडील खंडूजी हे शेतकरी असून चौगुला-वतनदार होते. मल्हारराव तीन वर्षांचे असतानाच वडील वारल्यामुळे आई त्यांना घेऊन खानदेशात तळोदे येथे भोजराज बार्गल या भावाकडे गेली. भोजराजाने आपला पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय बाजूला ठेवून एक पथक उभे केले होते. तो कंठाजी कदमबांडे यांच्या सेवेत होता. त्यामुळे मामाकडेच मल्हाररावांना लष्करात नोकरी मिळाली. १७२० मधील पेशवे-निजाम संघर्षात मल्हाररावांची कामगिरी पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या लक्षात आली. बाजीरावांनी मल्हाररावांचे धाडस पाहून त्यांना स्वतःच्या घोड-दळात घेतले (१७२१). त्यामुळे मल्हाररावांच्या जीवनास कलाटणी मिळाली. मल्हाररावांस खानदेशच्या भूमीची चांगली जाण होती. बाजीरावांनी १७२५ मध्ये मल्हाररावांना पाचशे घोडेस्वारांचे मुख्य नेमून त्यांच्याकडे उत्तर खानदेशची कामगिरी दिली. तसेच माळवा प्रांतातील चौथ आणि सरदेशमुखी जमा करण्याची जबाबदारीही सोपविली मात्र कंठाजी कदमबांडे यांच्या आश्रयाखाली आपला भाग्योदय झाला, ही गोष्ट ते कधीच विसरले नाहीत. त्यांनी आपला स्वतःचा झेंडासुद्धा कदमबांड्यांच्या झेंड्यासारखाच केला. नर्मदेच्या उत्तरेकडील मराठ्यांनी जिंकलेल्या प्रदेशाचे सर्व अधिकार पेशव्यांनी त्यांस दिले (१७३५). बाजीराव पेशव्यांच्या हाताखाली शिंदे व धारचे पवार यांसारखेच मल्हारराव हे पेशव्यांतर्फे इंदूर संस्थानचे अधिपती झाले. १७४५ साली म्हणजे अवघ्या वीस वर्षांतच मल्हाररावांकडे साडेचौऱ्याहत्तर लक्षांचा मुलूख देण्यात आला. उत्तर भारतात मराठी सत्तेचा विस्तार होऊन मराठी राज्याचे साम्राज्य निर्माण झाले. मल्हाररावांनी धनगर जातीचे अनेक लोक इंदूरमध्ये आणले. यांपैकी बुळे, लांबहाते वगैरे दहा-बारा लोकांनी तेथेच वास्तव्य केले. याशिवाय होळकरांच्या सरदारवर्गात काही ब्राह्मण घराणीही होती. गंगाधर तात्या चंद्रचूड अनेक दिवस मल्हाररावांकडे निष्ठेने राहिला. बाजीरावाने त्याला मल्हाररावांची फडणिशी दिली होती. मल्हाररावांस गुजरात, माळवा व खानदेश प्रांतांत सरंजाम खर्चास ११ परगणे पेशव्यांनी दिले होते. पुढे माळवा प्रांताची वाटणी २ होळकर, २ शिंदे आणि १ पवार या प्रमाणात झाली. बाजीराव पेशव्यांनी मल्हाररावांच्या विनंतीप्रमाणे त्यांची पत्नी गौतमीबाईंच्या नावाने तीन लक्ष उत्पन्नाचा मुलूख खाजगीकडे नेमूनदिला (२० जानेवारी १७३४).



      मल्हारराव होळकर
      मल्हारराव होळकर

      मल्हाररावांनी त्यांच्या आयुष्यात लहानमोठ्या एकंदर बावन्न लढायां-मध्ये भाग घेतला. त्यांपैकी १७२९ आणि १७३१ मध्ये गिरीधर बहादूर व दया बहादूर यांच्याशी झालेली लढाई व त्या दोघांचा केलेला पराभव ही महत्त्वाची मानली जाते. मल्हाररावांनी १७३५–३८ दरम्यान नानासाहेब पेशव्यांबरोबर भोपाळ, गुजरात, अंतर्वेदी, दिल्ली, कोंकण, वसई व आग्रा या ठिकाणी झालेल्या युद्धांत पराक्रम केला. तत्पूर्वीच बाजीरावानेमल्हाररावांना ८२ परगणे जहागीर देऊन माळव्याची राज्यव्यवस्थाहीत्यांच्याकडे सोपविली होती. वरील दोन लढायांशिवाय १७३५ मध्येआग्रा आणि गुजरात, १७३६-३७ मध्ये अंतर्वेद व दिल्ली, १७३७ मध्ये वसई इ. ठिकाणी पेशव्यांनी केलेल्या मोहिमांमध्ये मल्हाररावांनी सहभागघेऊन शौर्य दाखविले. याच सुमारास रेवाकाठचा बराच मुलूख मल्हाररावांनी जिंकला आणि महेश्वर येथे आपले मुख्य ठाणे केले. १७४३ मध्ये सवाई जयसिंगांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांत वारसा हक्काचे भांडण सुरू झाले, तेव्हा मल्हाररावांनी माधोसिंगांस मदत करून गादीवर बसविले. त्याबद्दल त्यांना ६४ लक्ष रुपये खंडणी, रामपुरा, भानपुरा, होडा व टोंक हे प्रांतमिळाले. दक्षिणेच्या सुभेदारीबद्दल झालेल्या निजामुल्मुल्कच्या मुलां-मधील तंट्यात पेशव्यांतर्फे शिंदे व होळकरांनी गाजीउद्दीनला मदतदेण्याचे ठरविले होते. १७५१ मध्ये मल्हाररावांनी रोहिल्यांविरुद्ध अयोद्धेच्या सफदरजंगास मदत केली. १७५४ मध्ये गाजीच्या मीरशिहाबुद्दीन नावाच्या मुलास जाटांविरुद्ध मदत करून जाटांच्या मदतीस आलेल्या दिल्लीच्याबादशहाचा मल्हाररावांनी पराभव केला या वेळी दीगजवळच्या कुंभेरीच्या वेढ्यात खंडेराव हे त्यांचे एकुलते एक पुत्र तोफेचा गोळा लागूनमरण पावले (१७५४). त्या वेळी खंडेरावांची पत्नी अहिल्याबाई या सोडून अन्य भार्या सती गेल्या. या प्रसंगी मल्हाररावांनी प्रतिज्ञा केली, ‘सुरजमल्लाचा शिरच्छेद करून कुंभेरीची माती यमुनेत टाकीन, तरच जन्मास आल्याचेसार्थक नाही तर प्राणत्याग करीन ‘. दिल्लीच्या रघुनाथरावांच्या १७५५ च्या मोहिमेत मल्हारराव हे त्यांच्या सोबत होते. शिवाय १७५६-५७ तसेच १७६६ या राघोबादादांच्या उत्तरेकडील स्वाऱ्यांमध्ये त्यांनी बरीच मदत केली. पानिपतच्या लढाईतील (१७६१) त्यांच्या कामगिरीबद्दल इतिहासाच्या अभ्यासकांत मतैक्य आढळत नाही. मल्हाररावांनी १७६३ मधील राक्षसभुवनच्या लढाईत माधवरावांसोबत निजामाचा पराभव करून पानिपतच्या पराभवाने खचलेल्या मराठा मंडळास संजीवनी दिली.



      पहिल्या बाजीरावांनी मल्हाररावांस संधी देऊन संस्थानिकांच्या दर्जास आणून ठेवले आणि उत्तरेकडील चौथचे अधिकार त्यांना प्रदान केले पण बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे (कार. १७४०–६१) यांच्या काळात नानासाहेबांनी मल्हाररावांस लिहिलेली पत्रे उपलब्धआहेत. त्या पत्रांत जयाजी शिंद्यांसोबत त्यांनी माळव्यात चौथाईच्या संदर्भात काही सूचना दिल्या. माधवरावांच्या काळात मल्हारराव होळकर हे माधवरावांनाही वचकून असत. जाटांच्या पारिपत्याकरिता रघुनाथ-रावांबरोबर अलमपूर येथे आले असता तेथेच अतिश्रमाने वृद्धापकाळीमल्हाररावांचे निधन झाले.



      मल्हारराव निरभिमानी असून धाडसी व शूर होते. ते फक्त युद्धकलेतच निष्णात नव्हते, तर राजकारण आणि राज्यकारभारातही हुशार व चाणाक्षहोते. आपल्या अंमलाखालील प्रांतांची त्यांनी वसूलनिहाय वर्गवारी करून व्यवस्था लावली होती. एकदा घेतलेला निर्णय ते सहसा बदलतनसत. माळव्यातील आपल्या मांडलिक राजांशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंधहोते. त्या वेळच्या प्रसिद्ध सरदारांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असूनराजपुतांपैकी राघवगडचा राजा बलिभद्रसिंग व बागळीचा राजा गोकुळदासहे त्यांचे ऋणानुबंधी स्नेही होते. बाळाजी बाजीराव व त्यानंतरचे पेशवेमाधवराव आणि दादासाहेब मल्हाररावांना पित्यासमान मान देत.



      मल्हाररावांच्या पत्नी गौतमीबाई यांच्यापासून झालेले एकुलते एकपुत्र म्हणजे खंडेराव होत. त्यांनी त्यांचा विवाह अहिल्याबाई शिंदे यांच्याशी लावून दिला होता (१७३३). खंडेराव खांदेरीच्या वेढ्यात तोफेचा गोळा लागून मरण पावले (१७५४). त्यांच्या इतर भार्यांबरोबर अहिल्याबाई सती जाणार होत्या पण अहिल्याबाईंना सती जाण्यापासून मल्हाररावांनी परावृत्त केले आणि राज्याची सर्व धुरा त्यांच्यावर टाकली. मल्हाररावांच्या चार भार्यां-पैकी गौतमीबाई आधीच मृत्यू पावल्या होत्या द्वारकाबाई व बजाबाई सती गेल्या, तर हरकूबाई अहिल्याबाईस साथ देण्यास मागे राहिल्या.



      संदर्भ : १. कुलकर्णी, अ. रा. खरे, ग. ह. मराठ्यांचा इतिहास, खंड ३, ( पुनर्मुद्रण), पुणे, २००६ .

      २. गर्गे, स. मा. संपा. मराठी रियासत, खंड ३, मुंबई, १९८९. ३. गर्गे, स. मा. संपा. मराठी रियासत, खंड ४, मुंबई, १९९०.

      कांबळे, र. ह. भिडे, ग. ल.


    3. [S53]
      WIKI.MR.मल्हारराव_होळकर, Wikipedia, (Wikipedia), https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%B.

      मल्हारराव होळकर

      मल्हारराव होळकर (Malhar Rao Holkar) ( १६ मार्च १६९३ - २० मे १७६६ ) हे मूळचे महाराष्ट्रातील क्षत्रिय- धनगर समाजातील होते. [1] ते भरत वर्ष सम्राट छत्रपती शाहू महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या माळवा (मध्य प्रदेश) प्रांताचे पहिले सुभेदार होते. छत्रपती शाहु महाराज यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना छत्रपती शाहु महाराजांनी इंदूर संस्थानाची जहागिरी दिली.[2]

      बालपण

      मल्हाररावांचा जन्म क्षत्रिय हाटकर कुटुंबातला होता. त्यांच्या वडिलांचा, खंडोजी वीरकर चौगुला यांचा, अशाच भटकंतीत पुणेसातारा जिल्ह्याच्या सीमेवरील निरा नदीच्या काठी असणाऱ्या होळ या गावी मुक्काम पडला होता. या गावी तांड्याचा मुक्काम असतानाच मल्हाररावांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी झाला. मल्हार लहान असतानाच खंडूजीचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला, म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ या मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले परंतु होळचे नाव त्यांच्यामागे कायमचे चिकटले. "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" या उक्तीप्रमाणेच छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले गुण दाखवू लागला.

      मल्हारराव आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसतांना स्वबळावर पुढे येत मराठयांचे मुख्य सेवक बनले. ते एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते. अंगी गुण असले, वीरश्री असली तर एक सामान्य धनगर मुलगा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो हे मल्हाररावांनी सिद्ध करून दाखवले.

      कारकीर्द

      मल्हाररावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली. शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली.

      भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. जेजुरीचा खंडेरायाच्या कृपादृष्टीमुळेच आपली प्रगती झाली असल्याची मल्हाररावांची धारणा होती, त्यामुळेच त्यांनी सुभेदारी मिळाल्याबरोबर जेजुरीला कुलोपाध्ये नेमले. मंदिराचे बांधकाम करण्याचा घाट घातला.

      उत्तरोत्तर मल्हाररावांची प्रगती होत होती, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते. गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा झाला होता. इसवी सन १७३३ मध्ये चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबरोबर पुत्र खंडेरावचा विवाह लावून देण्यात आला. १७ मार्च १७५४ मध्ये कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी खंडेराव छावणीतून बाहेर पडले आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण प्राप्त झाले. अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हाररावांना तिचा विचार बदलण्यात यश आले, परंतु बाकी अकराजणी सती गेल्या. पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हाररावांनी मोहिमा उघडल्या. इसवी सन १७५८ मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकाविले. यात त्यांना मल्हाररावांनी मदत केली. मात्र, मोगल सरदार नजीबाने केलेल्या चुका त्यांनी अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळे सोडून दिले. त्यांच्या याच कृतीने घात झाला आणि पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले. मल्हाररावांनी गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना देऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला.

      मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे आरंभी जिवलग मित्र होते. उत्तर हिंदुस्तान या दोघांनी गाजवून सोडला. मोगल बादशहाचे सर्व सरदार, वजीर दोहोंना टरकून असायचे. अब्दालीच्या तीन स्वाऱ्या झाल्यानंतर मराठेच आता बादशाहीचे रक्षण करू शकतील एवढा विश्‍वास बादशहाच्या मनात निर्माण झाला होता. तिसऱ्या स्वारीनंतर त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या सफदरजंग या वजीरामार्फत त्याने कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. (२७ मार्च १७५२) होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला, तरी या दोघां प्रबळ सरदारांचे सामर्थ्य पाहूनच बादशहा हा करार करायला प्रेरित झाला होता.

      जयाजी शिंदेंचा बिजोसिंगने केलेला खून आणि कुंभेरच्या लढ्यात खंडेराव होळकरांचा झालेला अपघाती मृत्यू या प्रकरणांमुळे शिंदे-होळकरांत जरी वैमनस्य निर्माण झाले असले तरी मराठी साम्राज्याच्या हितासाठी त्यांनी शिंदेंशी पुन्हा मैत्री साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. 'शिंद्यांशी मैत्र होते तोवर पेशव्यांनाही आमची धास्ती होती..' असे सार्थ उद्गार दत्ताजी शिंदेंनी त्यांची भेट नाकारल्यावर काढले. तरीही ते किल्मिष मनात न ठेवता मल्हाररावांनी बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे झुंजत असताना तुकोजीराव होळकरांना मदतीसाठी पाठवले.

      पानिपतच्या युद्धापूर्वीच १३ मार्च १७६० रोजी मल्हाररावांनी अब्दालीशी तह करून त्याला परतही पाठवायची सुरुवात केली होती, परंतु तोवर भाऊसाहेब पेशवेच उत्तरेत यायला निघाल्याने नजीबाच्या आग्रहाने अब्दाली येथेच थांबला. १४ जानेवारी १७६१ रोजी मल्हारराव होळकर ऐन वेळी रणमैदान सोडून गेले असा त्यांच्यावर आक्षेप आहे पण आता नव्या पुराव्यांच्या प्रकाशात संजय क्षीरसागर या संशोधकाने, मल्हारराव सायंकाळी साडेपाचपर्यंत रणमैदानावरच झुंजत होते व त्यांनी आपला सरदार संताजी वाघ यास भाऊच्या मदतीसाठी ससैन्य पाठवले होते हे सप्रमाण सिद्ध केले आहे.

      पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी एक दुःखद धक्का बसला, त्यांच्या पहिल्या पत्नी गौतमाबाई २९ सप्टेबर १७६१ रोजी मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे ते आणखीनच खचले. अहिल्येची राजकारणातील समज पाहून मल्हारराव अनेकदा तिच्याशी सल्लामसलत करीत असत, स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदाऱ्या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या.

      मृत्यू

      पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या. पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली.

      छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या.

      मल्हारराव होळकरांबद्दल मराठी पुस्तके

      • आया मल्हार (मल्हारराव होळकर यांच्या जीवनावरची कादंबरी, लेखक - अनंत ओगले)
      • सुभेदार थोरले मल्हारराव होळकर (मुरलीधर मल्हार अत्रे)
      • सेनासुभे मल्हारराव होळकर (बालसाहित्य, पंडित कृष्णकांत नाईक)
      • होळकरांची कैफियत (यशवंत नरसिंह केळकर)

      हे सुद्धा पहा

      संदर्भ

      1. See R. C. Dhere, Shikar Shingnapurcha ShriShambhu Mahadeo, 2001, Pune, (Marathi), Pg. 276, 277, 288, 297, 307, 312, 338, 384, 221, 143, 127, 78, 67, 45, 2
      2. A collection of treaties, engagements, and sanads relating to India and neighbouring countries, Volume 4
      This information is sourced from Wikipedia, the leading online open-content collaborative (crowd-sourced) encyclopedia. Wikipedia and/or TransLiteral Foundations can not guarantee the validaity of content above and can not be held responsible for inaccuracies or libelious information within. Please see Wikipedia General Disclaimer.






Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.