कवि मुक्तेश्वर मुदगल[1, 2, 3, 4]

Male


Personal Information    |    Sources    |    All

  • Name मुक्तेश्वर मुदगल 
    Title कवि 
    Gender Male 
    Person ID I573  Maratha Empire
    Last Modified 25 Apr 2022 

    Father चिंतामणी मुदगल 
    Mother गोदावरी मुदगल 
    Family ID F345  Group Sheet  |  Family Chart

  • Sources

    1. [S25]
      ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).


    2. [S51]
      श्री दत्त महाराज - www dattamaharaj. com, श्री अवधूत नागेश उंडे, (श्री अवधूत नागेश उंडे), http://www.dattamaharaj.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5., http://www.dattamaharaj.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.
      श्री मुक्तेश्वर, श्री संत एकनाथांचे नातु (इ. स. चे सतरावे शतक)
      जन्म: गंगामाई, एकनाथांची कन्या यांचे पोटी तेरवाड येथे, १७ वे शतक
      आई/वडिल: गंगामाई (गोदावरी) / चिंतामणी (लीला विश्वंभर) उपनाम मुदगल
      संप्रदाय: दत्त संप्रदाय
      विशेष: तेरवाड येथे दत्तमंदिर स्थापना

      कवि मुक्तेश्वर म्हणजे पैठणच्या संत एकनाथांचा दोहींत्र. एकनाथांच्या मुलीचा मुलगा. त्यांचा जन्म इ. स. १५७३ मध्ये झाला. त्यांचे वडील, चिंतामणी उर्फ लीला विश्वम्भर हे एकनाथांचे अनुग्रहित व मुक्तेश्वरांचे अध्यात्मिक गुरुही होते. त्यांचे उपनाम मुदगल. वयाच्या १० व्या वर्षापर्यंत ते मुके होते. मौजीबंधानानंतर त्यांना बोलता येऊ लागले. मुक्तेश्वरांचा कुलस्वामी सोनारीचा भैरव व कुलदेवी कोल्हापूरची महालक्ष्मी होती. श्री दत्त हे त्यांचे उपास्य दैवत होते. पूर्वयुष्याचा बराचसा काळ पैठणात आजोळीच गेल्याने ते पैठणच्या विद्वतभूमीत विविध शास्त्रात पारंगत झाले. संस्कृत व ललित वाङ्मय यांचा खूप अभ्यास केला. खेरीच महाभारतावरील नीळकंठी तसेच अन्य भारती टिकांचाही त्याने व्यासंग केला. त्याच्या जीवनातील गोष्टीविषयी तो स्वतः काधीही बोलले नाही. परंतु त्यांच्या ग्रंथांच्या विविधांगी अभ्यासावरून तो अतिशय टापटीपीचा, सूक्ष्मदृष्टीचा, विचक्षण, रसिक, चविष्ट भोजनभोक्ता स्पष्ट व सडेतोड वृत्तीचा, सत्वाशील, परमार्थप्रवण व कुटुंबवत्सल गृहस्थ होता. संस्कृत भाषेचा अभ्यास प्रचंड होता आणि मराठी भाषेवर प्रभुत्व होते. महाराष्ट्र देश, व मराठी भाषेचा इतका अभिमान ज्ञानेश्वरानंतर फक्त मुक्तेश्वरानाच आढळतो. प्रसंग वर्णनांची सूक्ष्मता, संभाषणे, हालचाली, हावभाव, अविर्भाव यांचे रुपकांनी सजीव चित्रण, विविध अलंकार आणि उत्कृष्ट रासाविर्भाव, गुणावती, नादवती, ओघवती, प्रासादिक, मधुर, ओजस्वी, प्रसंगी कोमल वा कठोर शैली, सहजवाणी आणि परिणामकारक अर्थ साधण्याची क्षमता हि त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत.

      मुक्तेश्वरांचे ग्रंथकर्तृत्व अफाट आहे. महाभारताची आदी, सभा, वन, विराट व सौप्तीक ही ५ पर्व, रामायण, गरूड गर्व परिहार, हरिश्चंद्र आख्यान, भगवद्गीता, मूर्खलक्षणे, गजेंद्र मोक्ष, शुकरंभा संवाद, विश्वामित्र भोजन, एकनाथ चरित्र इ. ग्रंथ काही पदे आरत्या भूपाळ्या एवढी ग्रंथरचना उपलब्ध आहे. भाषासौंदर्य, वर्णनशैली, निसर्गवर्णन इत्यादी बाबतींत मुक्तेश्वरांच्या हात धरणारा कवी प्राचीन काळात कोणी दुसरा नाही. त्यांना रामायणरचनेची स्फूर्ती नरसोबाच्या वाडीस झाली असावी.

      साहित्यसारितेचा हा मानदंड इ. स. १६४६ मध्ये तेरावाड येथे शरदावासी झाला

      मुक्तेश्वरांच्या कुटुंबात पारंपारिक विठोबा व लिला विश्वंभराची उपासना होती. एकनाथांचा हा नातू आपल्या आजोबाप्रमाणेच दत्ताचा उपासक होता. याच्या वडिलांचे नाव चिंतामणी, आईचे सासरचे गोदावरी व माहेरचे गंगामाई होते. याचा कुलदेव सोनारीचा भैरव असून कुलस्वामिनी कोल्हापूरची महालक्ष्मी होती. मुक्तेश्वरांच्या कुळात दत्तात्रेयांची उपासना त्यांच्या ‘लीलाविश्वंभर’ या अवताराची होती. ‘ॐ नमोजी विश्वंभरु । तो देव दत्तात्रेय जगद्गुरू’, ‘पुराण पुरुषेश्वरा गुरुमुर्ती दातारा लीलाविश्वंभरा दत्तात्रेया’ असे याने म्हटले आहे. कोणी लीलाविश्वंभर हे मुक्तेश्वरांचे गुरूही मानतात.

      ‘पवित्र सरिता कृष्णवेणी पंचगंगा समस्थानीं । नृसिंहसरस्वतींचे चरणीं । ग्रंथप्रसाद लाधला ॥’

      असे यांनी म्हटले आहे. तेरवाड येथे मुक्तेश्वरांचे दत्तमंदिर असून तेथे त्यांच्या पूजेतील दत्तात्रेयांच्या पादुका आहेत.

      ‘विश्वेश लीलाविश्वंभरु । दत्तात्रय जगद्गुरु । तत्प्रसादें मुक्तेश्वरु । निरोपीं तें परिसावें ॥
      चिन्मूर्ती लीलाविश्वंभरु । दत्तात्रय जगद्गुरु । त्याचेनि नामें मुक्तेश्वरु । कथा बोले भारती ॥’
      अशा अनेक ठिकाणी त्याने उल्लेख केलेले आढळतात.

      मुक्तेश्वर हे शिवाचे उपासक असल्यामुळे यांनी शिवरूप दत्ताची आराधना केलेली दिसते. ‘कां नाभिपादांत कमळासनु । मध्यकंठांत रमारमणु । स्कंधावरुता त्रिलोचन । अंगयत्रीं जो येकु’ अशी त्रिमूर्ती शिवाची म्हणजे दत्तात्रेयांची कल्पना त्यांनी केलेली आहे.

      पैठणच्या नाथांचा हा प्रतिभाशाली नातू काही काळ तेरवाड सारख्या दूरच्या आणि ५००-६०० वस्तीच्या खेड्यात असावा याचे आश्चर्य वाटते. कदाचित त्यांचे पूर्वज्यांच्या वास्तव्यामुळे असेल असे वाटते. दत्तभक्त मुक्तेश्वर फिरत फिरत नरसिंह वाडीच्या परिसरात आले असता पंचगंगेच्या काठी असलेल्या निवांत व निसर्गरम्य खेड्याचे आकर्षण वाटून ते येथेच स्थिरावले. तेरावाड जवळ पंचगंगा उत्तरवाहिनी झाली आहे. यामुळे हि नदी एक तिर्थ मानले जाते. येथे मुक्तेश्वरांच्या पूजेतील दत्तपादुकांवर एक छोटेशे छप्पर उभे आहे तरीही ते दुर्लक्षित आहे. मुक्तेश्वरांच्या दाहनभूमीवर त्याचवेळी एक वृन्दावन बांधलेले होते, परंतु आता त्याचा पत्ता नाही. महाराष्ट्राच्या या कवीची व सत्पुरुषाची महत्ता छत्रपतींना पटली पण त्याच्या वंशजांनी त्यांचे महत्व व वैभव वाढविले नाही हे एक दुर्दैव आहे.

      श्री नृसिंहवाडीपासून जवळच तेरवाड येथे मुक्तेश्वर स्थापीत दत्तमुर्ती व पादूका आहेत.


    3. [S39]
      मराठी विश्वकोश, (मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ), https://vishwakosh.marathi.gov.in/.
      मुक्तेश्वर : (?-?). श्रेष्ठ मराठी कवी. संत एकनाथांचा तो नातू होय. मुक्तेश्वरासंबंधी अनेक प्रकारचे मतभेद आहेत. पहिला मतभेद त्याच्या जन्मकाळाचा. या संबंधात मुख्यतः पुढील दोन शकवर्षांचा वाद आहे. शके १५३१ आणि शके १४९५–९६. पैकी पहिले शकवर्ष मुक्तेश्वराचे जन्मवर्ष म्हणून महाराष्ट्र सारस्वतकारांनी मानले, तर दुसरे प्रा. द. सी. पंगूंनी. हा प्रश्न अद्याप अनिर्णित आहे. दुसरा वाद मुक्तेश्वराच्या नावाचा. त्याचे मुक्तेश्वर हे नाव व्यक्तिनाम की मुद्रानाम असा प्रश्न आहे. पण ते व्यक्तिनामच दिसते. त्याच्या काव्यात येणारी विश्वंभर आणि लीलाविश्वंभऱ ही पदेही वादग्रस्त ठरली आहेत. लीलाविश्वंभर त्याचे मातापिते की गुरू असा हा प्रश्न. वरील वादग्रस्त प्रश्न वगळल्यास मुक्तेश्वराविषयी पुढील गोष्टी सर्वमान्य आहेत. त्या अशा : तो संत एकनाथांच्या मुलीचा मुलगा, त्याच्या पित्याचे नाव चिंतामणी, गोत्र अत्री, आराध्य दैवत दत्त, कुलस्वामिनी कोल्हापूरची महालक्ष्मी व कुलदैवत सोनारीचा भैरव आणि त्याचे वास्तव्य गोदातीरी पैठण येथे. या सर्व गोष्टीही पूर्णपणे सत्य आहेतच असे नाही, असे अ. का. प्रियोळकरांनी त्याच्या आदिपर्वाच्या संपादनाच्या निमित्ताने लिहिलेल्या ‘मुक्तेश्वराचा शोध’ या निबंधावरून दिसते. मुक्तेश्वराचे मृत्यूस्थळ तेरवाड परंतु त्याचा मृत्युकाळही अज्ञातच आहे.

      मुक्तेश्वराची ग्रंथरचना पुढीलप्रमाणे आहे : (१) संक्षेप रामायण (२) स्फुट काव्ये (३) भारताची पर्वे. रचनेचा क्रमही वरीलप्रमाणेच दिसतो. प्रथम त्याने संक्षेपरामायण लिहिले. १,७२२ ओव्यांचे हे सात कांडी रामायण मुख्यतः एकनाथांच्या भावार्थ रामायणावर आधारलेले असून त्या बृहद्‌ग्रंथाच्या मानाने हे खूपच आटोपशीर आहे. ते लिहिताना मुक्तेश्वरांपुढे संस्कृत पंचमहाकाव्यांचा आदर्श असावा, असे त्यातील कांडात्मकता किंवा सर्गयुक्तता, वर्णने, वृत्तयोजना, अलंकार-प्राचुर्य, पदलालित्य इत्यादींवरून वाटते. त्याने ते विविध अक्षरगणवृत्तांत रचिले असून यमक, अनुप्रास. श्लेष इ. शब्दालंकारांवर त्याचा भर आहे. त्यावरूनही त्याचे प्रथमत्व जाणवते.

      मुक्तेश्वराच्या स्फुट काव्यांत शुकरंभासंवाद, गजेंद्रमोक्ष, हनुमंताख्यान, विश्वामित्रभोजन, हरिश्चंद्राख्यान इ. पौराणिक आख्याने येतात. यांशिवाय त्याने एकनाथचरित्र लिहिले असून भगवद्‌गीतेचा श्लोकबद्ध अनुवादही त्याने केला आहे. मूर्खाची लक्षणे या नावाचे एक लहानसे प्रकरणही त्याच्या नावावर आहे. याला आधार महाभारताच्या उद्योगपर्वात विदुराने धृतराष्ट्राला दहा श्लोकांत मूढलक्षणे सांगितली आहेत, त्याचा आहे. त्याशिवाय पदे, आरत्या वगैरे आहेत त्या निराळ्याच. या सर्व स्फुटरचनेची ग्रंथसंख्या अडीच हजारांच्या घरात जाते. ही सर्व काव्ये आकाराने लहान असली, तरी त्यांतूनही त्याचे अस्सल कवित्व जाणवते.

      मुक्तेश्वराची कीर्ती त्याच्या भारतीय पर्वामुळे आहे. आतापर्यंत त्याची आदि, सभा, वन, विराट आणि सौप्तिक ही पाच पर्वे उपलब्ध झाली असून त्याने तेवढीच लिहिली असे वाटते. मूळ संस्कृत महाभारत पुढे ठेऊन त्याने ही पाच भारतीय पर्वे रचली. तसेच त्याच्या पूर्वी झालेले प्राकृत भारतीय ग्रंथ त्याने पाहिले होते आणि प्रसंगविशेषी जे महाभारतात नाही तेही मुक्तेश्वराने सांगितले आहे. आपल्या भारतासाठी त्याने ओवीछंद योजिला असून त्याची ओवी लवचिक आणि गतिमान आहे. ज्ञानेश्वरीनंतर इतकी सुंदर आणि अर्थवाही ओवी मुक्तेश्वराचीच आढळते. त्याचा आत्मविश्वास दांडगा असून

      ‘मुक्तेश्वराचा वाग्विलास । देशभाषा परि संतोष ।

      मानूनिया साक्षीलागी व्यास । उभा असे जवळिके ।।’

      असे तो आत्मप्रत्ययाने म्हणू शकतो. त्याची ही भारतीय पर्वे म्हणजे सुंदर आख्यानक कवितेची खाणच असून दुष्यन्त-शुकुंतला, नल-दमयंती आणि सावित्री यांची त्याने गायिलेली आख्याने ही, त्या खाणीतील निवडक रत्ने आहेत. मुक्तेश्वर सर्व लोकांत मिसळणारा कवी असला पाहिजे. त्याच्या भारतात तत्कालीन समाजस्थितीचे प्रतिबिंब पडले आहे. लोकांच्या चालीरीती, वस्त्रेपात्रे, आहारविहार, व्यापारटापार इ. सामाजिक व्यवहारातील तपशील मुक्तेश्वर सहजपणे सांगून जातो. त्याबरोबरच त्याच्या या हव्यासामुळे त्याच्या काव्यात कालविपर्यास व अनौचित्य हे दोषही निर्माण झाले आहेत. दुष्यन्ताने जिंकलेल्या राजांमध्ये फिरंगी, इंग्रज ह्यांसारख्याचा समावेश करण्याची त्याला दिक्कत वाटत नाही. पण हे दोष किरकोळ असून त्यांमुळे त्याच्या रससिद्धत्वाला कोणत्याही प्रकारे बाध येत नाही. रसोत्कटता, निवेदनशैली, वर्णनकौशल्य, व्यक्तिचित्रण, अलंकारयोजना ही त्याच्या आख्यानक कवितेची वैशिष्ट्ये आहेत. परंपरित सांग रूपके तो कौशल्याने योजतो.

      मुक्तेश्वर स्वतः व्यासंगी ग्रंथकार असूनही त्याची बहुश्रुतता त्याच्या काव्याच्या आड आलेली नाही. पांडित्य आणि रसिकता यांचा संगम त्याच्या ठिकाणी दिसून येतो. पण स्थायिभाव शृंगाराचा असल्यामुळे व कोठे थांबावे याचा विवेक क्वचिच सुटल्यामुळे त्याच्या हातून काही ठिकाण उत्तान, उच्छृंखल रचनाही झाली आहे. पण त्याची शैलीच इतकी मोहक आहे, की ती अश्लीलावरही काव्यात्मकतेचे पांघरूण घालू शकते. पण त्यामुळे संयमाचा आणि युक्तायुक्त विचाराचा अभाव हा दोष झाकला जात नाही. त्याचे एकूण काव्य पाहता ‘अध्यात्माचे वाङ्‌मयावरील जोखड फेकून देणारा पहिला कवी’ हे त्याचे रा. श्री. जोग यांनी केलेले वर्णन सार्थ वाटते.

      संदर्भ :
      १. नांदापूरकर, मा. गो. मुक्तमयूरांची भारते, हैदराबाद, १९५६.
      २. पांगारकर, ल. रा. कविवर्य मुक्तेश्वर, पुणे, १९२२.
      ३. प्रियोळकर, अ. का. मुक्तेश्वराचा शोध, प्रस्ता. आदिपर्व, खंड १, मुंबई, १९५१.
      ४. भिडे, बा. अ. मुक्तेश्वर, मुंबई, १९२६.

      तुळपुळे, शं. गो.


    4. [S26]
      केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/., https://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-50/12759-2013-03-13-11-40-10.
      मुक्तेश्वर- याचा जन्म सुमारें शके १५२१ तील असून हा एकनाथाच्या गोदूबाई नांवाच्या मुलीचा मुलगा होय. मुक्तेश्वर हा मूळ पैठणचा, परंतु पुढें पैठण सोडून तो दुसरीकडे गेला असें दिसतें. याला मौजे सोनारीचें जोसपण होतें. हा कथाकीर्तनें करीत असे. याचें गोत्र अत्रि व बापाचें नांव चिंतामणी उर्फ विश्वंभर होतें. याला विद्येची आणि ग्रंथरचनेची गोडी एकनाथापासून लागली. त्याच्या लहान लहान काव्यांतहि एक तर्‍हेचें कौशल्य व धाटणी दिसून येते. याचें रामायण मात्र मोठाल्या काव्यांपैकीं प्रथम रचलें असावें. मुक्तेश्वराचीं सृष्टिसौंदर्याची वर्णनें व कोणत्याहि मनोविकाराची भावनेसह रेखाटलेलीं शब्दचित्रें मनोवेधक आहेत. तो आपल्या वर्णनांत अनेक रसांची भेसळ करून देऊन वाचकांच्या मनांत अनेक विकार एकदम उत्पन्न करतो. याच्या काव्यांत कालविपर्यासाचा दोष आहे. याचें रामायण कायतें पूर्ण आहे. महाभारताचीं पांचच पर्वे उपलब्ध आहेत. तशींच इतर लहान लहान आख्यानेंहि त्रुटितच आहेत. याचे अनुपलब्ध ग्रंथ फार आहेत अशी लोकसमजूत आहे. हा शके १५७१ पूर्वी तेरवाड येथें वारला. तेथें याची समाधि आहे. यानें आपलें महाभारत रचलें त्यापूर्वी विष्णुदासनाम्याचें महाभारत यानें पाहिलें असावें असें दिसतें. हा दत्तभक्त होता. याचा नातु मुक्तेश्वर नांवाचाच असून त्यानेंहि काव्यरचना केली आहे व तिच्यावर आजच्या काव्यरचनेची छाप पडली आहे. (कवि चरित्र).





Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.