तुळाजी आंगरे[1, 2]

Male - 1786


Personal Information    |    Sources    |    All

 • Name तुळाजी आंगरे 
  Gender Male 
  Died 1786 
  Person ID I517  Maratha Empire
  Last Modified 4 Apr 2022 

  Father कान्होजी आंगरे,   b. 1669,   d. 3 Jul 1729  (Age 60 years) 
  Mother लक्ष्मीबाई आंगरे 
  Family ID F314  Group Sheet  |  Family Chart

 • Sources

  1. [S26]
   केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/., https://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-43-51/8069-2013-02-12-06-35-14.
   तुळाजी. - मानाजीचा सख्खा भाऊ तुळाजी हा संभाजीजवळ राहून कारभार पहात असे. इस. १७४१त संभाजी मरण पावला तेव्हां तुळजींनें सभांजीची जागा घेऊन त्याचें भांडण पुढें चालविलें. तुळाजी हा पेशव्यांचा कट्टा द्वेष्टा असल्यामुळें पेशव्यांनीं इंग्रजांची मदत घेऊन तुळाजीचे सुर्णदुर्ग, विजयदुर्ग वगैरे किल्ले काबीज केले व तुळाजीस व त्याच्या बायकापोरांस कैद करून (स.१७५६) डोंगरी किल्ल्यांत अटकेंत ठेविलें तुळाजी पहा).   तुळाजी आंग्रे- तुळाजी हा कान्होजी आंग्रयाचा रक्षापुत्र (राजवाडे खं. ६ ले. ४५३). त्याच्या आईचें नांव गहिनाबाई. स. १७३४ त हा आपला सावत्र बंधु संभाजी याजबरोबर हबशापासून अंजनवेल काबीज करण्यास गेला. संभाजी दौलतीवर असतां हा त्याचा कारभारी होता. मन १७४० त हिराकोटाजवळ संभाजीच्या व पेशव्यांच्या लोकांत जी झटपट झाली तींत हा जखमी होऊन पेशव्यांचा हातीं सांपडला. पुढें (१७४१ डिसेंबर) संभाजी मरण पावल्यावर याचें व पेशव्याचें सडकून वैर जुंपलें. यानें यमाजी शिवदेवाच्या वशिल्यानें मानाजीविरुद्ध शाहूकडे कारस्थान चालविलें. तेव्हां जो अंजनवेल घेईल त्यास सरखेलीचें पद देऊं अशी शाहूनें अट घातली, त्याप्रमाणें तुळाजीनें स. १७४२ त अंजनवेलचा किल्ला घेतला. त्यावर आंग्रे घराण्यांतील तंटा मिटविण्याकरितां शाहूनें मानाजीस वजारतमाब हा किताब देऊन त्यास कुलाब्याचा अधिकार दिला व तुळाजीस सरखले ही पदवी देऊन सुवर्णदुर्गापासून थेट दक्षिण कोंकणपर्यंतची हद्द वाटून दिली. ही तडजोड तुळाजीस पसंत पडली नाहीं. त्यानें मानाजीचे कबिले अडकवून ठेविल्यामुळें ब्रह्मेंद्रस्वामीनें ते सोडून देण्याविषयीं त्यास एक पत्र लिहिलें. शाहूच्या पश्चात् तर तुळाजीनें वर्तन अनावर झालें. रा.वासुदेवशास्त्री खरे म्हणतात कीं तुळाजी हा चित्पावनांचा कट्टा द्वेष्टा असून तो त्यांचा फार छळ करीत होता (मराठे व इंग्रज प्रस्तावना, पृ. १८). त्यानें ब्राह्मणांस फार उपद्रव केला. रयतेस छाडाछेड केली. तो सरकारांत नेमणुकीप्रमाणें ऐवज न भरतां उद्दामपणें वागूं लागल व पेशव्यांस मुळींच जुमानीनासा झाला. ताराबाईचा व पेशव्यांचा तंटा जोरांत असतां तुळाजीनें उचल घेतली; आरमाराच्या जोरानें पेशव्याविरुद्ध वावरणार्‍या तुळाजीसक नुसत्या फौजेच्या बळावर जिंकणें पेशव्यांस शक्य नव्हतें. या कारणास्तव आरमारास प्रतिआरमार आणून तुळाजीशीं युद्ध करण्याचा व्यूह रचला. तुळाजीचा नाश करण्यास इंग्रज टपलेलेच होते. यामुळें पेशव्यांनीं इंगर्जांची मदत मागतांच त्यांनीं ती मोठ्या खुषीनें देऊं केली.

   यावेळीं रत्‍नागिरी किल्ला बावडेकर अमात्यांचा असून तो तुळाजीनें हस्तगत केला होता, तो व सुवर्णदुर्ग असे दोन किल्ले तुळाजीजवळ पेशव्यानें मागितले. तुळाजी म्हणाला कीं सुईच्या आग्राइतकी मृत्तिका देणार नाहीं. तेव्हां पेशव्यानें ''रामाजी महादेव यांस सांगून, इंग्रज अनुकूल करुन तुळाजीवर मसलतीचा योग मांडिला. सुवर्णदुर्गांत व विजयदुर्गांत वगैरे फितुरांची संधीनें रामाजी महादेव खेळूं लागले.''

   तुळाजीविरुद्ध पेशव्यांनीं करवीरकरांशींहि कारस्थान आरंभिलें तेव्हां करवीरकर यांनीं तुळाजीकडून अंमल दूर करुन सरकारांत दिला (१८ फेब्रुवारी १७५५) .

   रामाजी महादेवामार्फत इंग्रज व पेशवे यांच्या दरम्यान करार होऊन (१९ मार्च १७५५) इंग्रजांचें आरमार मुंबई बंदर सोडून निघालें (२२ मार्च). दुसर्‍या दिवशीं कमांडर जेम्स यानें राजापुरी बंदराबाहेर आंगर्‍यांच्या १८ जहाजांचा पाठलाग करुन त्यांनां पळवून लाविलें. पुढें पेशव्यांचीं ७ तारवें, १ बातेला व ६० गलबतें इंग्रजांस मिळालीं (ता. २५), ता. २९ ला इंग्रजांचा व आंगर्‍यांचा सामना होऊन, इंग्रज आंगर्‍यांचा पाठलाग करीत जयगडपावेतों जाऊन दुसर्‍या दिवशीं सुवर्णदुर्गास परत आले. त्याच वेळीं रामाजीपंत हा किल्ल्यावर मारा करीत होता. त्यास इंग्रजांनीं मदत केली. किल्ल्यांतील लोकांचाहि मारा कांहीं कमी नव्हता. ता. ३ एप्रिल रोजीं किल्ल्यांतील दारुखाना आग लागून उडाला व यामुळे किल्ल्यांतील लोक सैरावैरा पळूं लागले. दुसर्‍या दिवशीं संध्याकाळीं तहाचें बोलणें लावण्यास किल्ल्यांतील लोक रामाजीपंताकडे आले. परंतु ते बोलाचालींत वेळ काढून बाहेरच्या मदतीची वाट पहात आहेत अशी शंका येऊन रामाजीपंतानें ता. १२ रोजीं तोफांचा मारा करुन किल्ला घेतला. सुवर्णदुर्गाशिवाय मराठ्यांनीं तुळाजीचे आणखी सहा किल्ले इंग्रंजाच्या मदतीनें काबीज केले. नंतर पावसाळा सुरु झाल्यामुळें मोहीम थांबली. पावसाळा संपल्यावर मोहिमेस पुन्हां सुरुवात झाली. आंग्रे दरसाल पेशव्यास कांहीं खंडणी पाठवीत असत. ती तुळाजीनें बंद केल्यामुळें ती मागण्याकरितां पेशव्यांचे वकील मध्यंतरीं तुळाजीकडे गेले असतां त्यानें त्यांचीं नाकें कापून परत पाठविलें होतें, त्यामुळे पेशवे जास्त चिडले. पेशव्यांची फौज खंडोजी माणकराच्या हाताखालीं आंगर्‍याच्या मुलुखांत शिरून त्याचा प्रदेश काबीज करीत चालली. तिनें विजयदुर्ग किल्ल्याशिवाय बाकीचा सर्व प्रदेश काबीज केला. (जाने. १७५६). तेव्हां तुळाजी आंग्रे पंताकडे येऊन तहाच्या खटपटीस लागला. त्यावेळीं (फेब्रु. १७५६) इंग्रजी आरमार विजयदुर्गपुढें येऊन दाखल झालें, त्यावेळीं तुळाजीचें व पेशव्यांचें तहाचें बोलणें चाललें असल्याचें इंग्रज अधिकारी वाटसनला कळलें. परंतु तुळाजीशीं तह करावयाचा नाहीं, असा निश्चय करुन एकदम किल्ला स्वाधीन करण्याविषयीं वाटसननें त्यास निरोप पाठविला व वेळेवर जबाब न आल्यामुळें आणि पेशवेहि जरा कां कूं करीत आहेत असें पाहून ता. १२ रोजीं इंग्रजांनीं किल्ल्यावर तोफांचा मारा सुरु केला. चार वाजतां इंग्रजांचे गोळे आंगर्‍यांच्या जहाजांवर पडून त्यांचीं सर्व लढाऊ जहाजें जळून खास झालीं. ता. १३ रोजीं सकाळीं इंग्रजांचे कांहीं लोक जमीनीवर उतरले. पेशव्यांची फौजहि उतरणार होती. तीस उतरूं देऊं नये म्हणून इंग्रजांनीं पुन्हां किल्ल्यावर मारा सुरु केला. कॅप्टन फोर्ड आपले लोक बरोबर घेऊन संध्याकाळीं किल्ल्यांत शिरला; आणि त्यानें वर इंग्रजांचें निशाण लाविलें. तहाची वाटाघाट चालू असतां इंग्रजांनीं किल्ल्यास वेढा दिला म्हणून तो उठविण्याबद्दल रामाजीपंतानें पुष्कळ प्रयत्‍न केले. इंग्रजांस किल्ल्यांत दहा लक्षांचा ऐवज मिळाला. तो त्यांनीं सर्व ''तुम्ही तुळाजीशीं संधान ठेवून करार मोडला अशी'' उलट सबब सांगून एकट्यानींच दडपला. वास्तविक इंग्रज हें मदतीस आले होते व मराठे सांगतील त्याप्रमाणें त्यांनीं वागण्याचें काम होते. असें असतांना किल्ला घेण्यासठीं व मराठे आरमारांत दुफळी जाणून इंग्रजांनीं किल्ला घशांत उतरविला. यानंतर एक महिन्यांत तुळाजीचा सर्व प्रांत व २७ किल्ले दोस्तांनीं घेतले.

   शेवटीं तुळाजी हा पेशव्यांचा खंडोजी माणकर यांच्या स्वाधीन झाला. त्यास मरेपर्यंत कैदेंत ठेविलें. तुळाजीनें कैदेंत असतांनाच फंदफितुरी करुन पेशव्यांस बराच उपद्रव दिला. नानासाहेबांच्या मृत्युसमयीं तुळाजी दंगा करणार होता. तुळाजीस वंदन, सोलापुर, राजमाची, विसापुर, नगर , चाकण, दौलताबाद वगैरे ठिकाणच्या किल्ल्यांत कैदेंत ठेविलें होतें. अखेर तो वंदन येथें कैदेंतच मेला. कैदेंत त्याच्या पायांत बेडी असे. मात्र त्याचे पत्र व बायका बरोबर असत. पुत्रांनींसुद्धां बंडें वगैरें केलीं. त्या सर्वांच्या पोटगीचा बंदोबस्त पेशव्यांनीं ठेविला होता. तुळाजीचे दोन मुलगे बारा चौदा वर्षानीं कैदेंतून पळून मुंबईस इंग्रजांच्या आश्रयास गेले असें म्हणतात.

   एका इंग्रज व्यापार्‍यानें तुळाजीचें वर्णन पुढीलप्रमाणें केलें आहे. ''तुळाजी निमगोरा, उंच, भव्य देखणा व अत्यंत रुबाबदार होता. त्याला पाहिल्याबरोबर मूर्तिमंत शौर्याची कल्पना मनांत येई. त्याची कृतीहि रुपास साजेशीच होती. कोणतेंहि जहाज त्याच्या तावडींत सांपडलें म्हणजे तें सहसां सुटून जात नसे. इंग्रज व्यापारी त्याच्या त्रासास इतके कंटाळलें कीं, ''देवा कसेंहि करुन यास आमच्या तावडींत आणून दे,'' अशी परमेश्वराची ते करुणा भाकूं लागले. तुळाजीची शक्ति व तयारी परिपूर्ण होती. त्याची बंदरें भरभराठींत असून रयत सुखी होती. तीस हजार फौज त्याजपाशीं जय्यत होती. तोफखान्यावर अनेक कुशल यूरोपीय लोक लष्करी व आरमारी कामें झटून करीत होते. त्याच्या आरमारांत साठांवर जहाजें असून शिवाय हत्ती, दारुगोळा व शस्त्रास्त्रें असंख्य होतीं. (राजवाडे खंड १,२,३,६; शाहुमहाराज चरित्र; धाकटे रामराजेचरित्र; ब्रह्मेंद्रचरित्रः पत्रें यादी; इ.सं. आंगरें हकीगत; कैंफियती; नानासाहेबांची रोजनिशी; फॉरेस्ट-मराठा सिरीज; एडवर्ड ईव्ह-व्हायेज ऑफ इंडिया; डफ.)


  2. [S25]
   ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
   तुळाजी याचें सर्वच कथानक विचित्र आहे. त्याच्या पराक्रमास सीमा नव्हती पण
   पेशव्यांचा द्वेष करून आरमाराचा नाश केला. त्याची तीस वर्षे कैदखान्यांत गेली.
   दोन बायका व दोन पुत्र रघूजी व संभाजी असे होते. हे त्याचे पुत्र कैदेंत असतांना त्यास पळून गेले.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.