अंबाजी इंगळे[1, 2, 3, 4, 5]

Male 1728 - 1809  (81 years)


Personal Information    |    Sources    |    All

  • Name अंबाजी इंगळे 
    Nickname अंबूजी 
    Born 1728 
    Gender Male 
    Died 4 JUN1809 
    Person ID I435  Maratha Empire
    Last Modified 14 Mar 2022 

    Father त्रिंबकजी इंगळे 
    Family ID F276  Group Sheet  |  Family Chart

    Children 
    +1. त्रिंबकराव इंगळे
    Last Modified 14 Mar 2022 
    Family ID F277  Group Sheet  |  Family Chart

  • Sources

    1. [S25]
      ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
      अंबूजीचें सर्व चरित्र वैचित्रपूर्ण व मराठयांचे हृद्गत दाखविणारें आहे तें स्वतंत्रच लिहिणें अवश्य आहे. त्यानें मराठी राज्यांतून फुट्न इंग्रजांशीं अल्पकाळ स्नेह केला. यशवंतराव होळकरानें त्यास वठणीस आणिले.


    2. [S25]
      ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
      इंगळे, अंबाजी-महादजी सिद्याचा प्रमुख साहयकारी. हा व याचें विस्तृत कुटुंब
      यांचा संबंध स. १७७२ पासून मराठेशाहीच्या अखेर पावतों इतिहासांत यतो. वंश ग्वाल्हेरीस विद्यमान आहे. महाराष्ट्रीय क्षत्रिय मराठे.


    3. [S35]
      bolbhidu.com ambaji-ingle, https://bolbhidu.com/ambaji-ingle/.


    4. [S27]
      इतिहासाच्या पाऊलखुणा, (Facebook), https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna., https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna/posts/3189293248023874/.
      प्रमोद करजगी

      अंबुजी इंगळे: उत्तर मराठेशाहीतील एक विस्मृतीत गेलेला सेनापती
      मित्रानो, महादजी शिंदे यांचे प्रभाव क्षेत्र उत्तेरेकडे अगदी लाहोरपर्यंत पसरले होते. आणि या क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यक्षम व समर्थ अशा सहकाऱ्यांची त्यांना आवश्यकता होती हे ओघाने आलेच. जीवबादादा बक्षी, राणेखान भाई, फ्रेंच सेनापती डी बॉयन, लखबादादा लाड,रायाजी पाटील, अंबुजी इंगळे अशा एकाहून एक हुशार व हुरहुन्नरी नररत्ने त्यांच्यापाशी होती. यापैकी प्रत्येक जण आपल्यावर सोपवलेले कार्य मन लावून व चलाखीने करणारा होता. अशा रत्नांच्या पैकी एक म्हणजे अंबुजी इंगळे होय. अशा एक त्यामानाने अज्ञात असणाऱ्या वीर पुरुषाची माहिती या लेखातून आपण घेणार आहोत.अंबुजी इंगळे यांचे नाव इतिहासात बऱ्याच ठिकाणी अंबाजी इंगळे असे आलेले आढळते.
      इंगळे कुटुंबाची ऐतिहासिक पार्श्वभूमी:इतिहासातील अप्रसिद्ध असे हे इंगळे कुटुंब मुळात सोळंकी ठाकूर होते आणि बुंदी,कोटा(राजस्थान)मधून दक्षिणेत आलेले होते. राजा अंबाजी यांचे वंशज हे भाऊजीराव शिंगणापूर (सातारा जिल्ह्यातील फलटणजवळ असलेल्या) देशमुखांच्या हाताखाली चाकरीला होते. दिल्लीचा सम्राट शहा आलम याने दिल्ली दरबारामध्ये राजा अंबाजी बहाद्दूर इंगळे अशी सनद त्यांना दिलेली होती. सनद देताना अनेक तालुक्यांचा कारभार सम्राटाने त्यांना जहागिरीच्या स्वरूपात बहाल केला होता. अंबुजी इंगळे याचे वडील त्रिंबकजी हे सुद्धा एक लढवैय्या शिपाई होते आणि पेशव्यांचे सामर्थ्यवान सरदार मल्हारराव होळकरांच्या सोबत उत्तरेत आलेले होते.त्याच्या आधी काही दिवस ते पेशवांच्याकडे नोकरीला होते.त्यांच्या इमानदारीमुळे त्यांना महदूंगा गावाची सनद पेशवे सरकार कडून मिळाली होती. त्रिंबकजी इंगळे ही महाराष्ट्रातील कदाचित एकच अशी असामी असेल की जे आपल्या पांचही पुत्रासोबत पानिपतच्या भीषण लढाईत लढले असतील. या लढाईत मराठे जरी पराजित झाले तरी त्रिंबकजी आणि अंबुजी यांनी या लढाईत मोठे शौर्य दाखवले होते. त्रिंबकजी यांचा मृत्यू राजस्थानातील सीताबर्डी येथे झाला. त्यांची छत्री आज ही मौजे सिकरोडबावडी येथे आहे.
      अंबुजी इंगळे यांचा उदय: त्रिंबकजींच्या मृत्यूनंतर अंबुजी इंगळे यांनी आपले कर्तृत्व दाखवून महादजी शिंदे यांचे ते एक विश्वासू अधिकारी बनले. अंबुजी इंगळे यांचा जन्म सन१७३०साली झाला, म्हणजे ते महादजींचे समवयस्क होते असे दिसते. दुर्दैवाने अंबूजींच्या सुरुवातीच्या पन्नास वर्षाबद्दल फारशी काही माहिती उपलब्ध होत नाही. इंग्रज इतिहासकार टी डी बौटन यांनी लिहिलेल्या ‘मराठ्यांच्या लष्करातून पाठवलेली पत्रे’ यात अंबुजी इंगळे यांचे वर्णन असे केलेले आहे. अंबुजी हे उंच व वयाच्या मानाने (त्या सुमारास त्यांचे वय ८०च्या पुढे होते) भारदस्त दिसणारे व्यक्तिमत्व होते, ते वर्णाने काळेसावळे असून त्यांच्या चेहऱ्यावर विनोदी झाक दिसत असे, त्यांचा पेहराव अतिशय साधा असे, जणू काही एखाद्या कंजूष माणसाचा असावा तसा. बौटोन यांनी केलेल्या अंबूजींच्या कौतुकपर वर्णनात ते पुढे म्हणतात की अंबुजी शामियान्यात आल्यावर त्यांनी आपली आपली कृतज्ञता तेथे उपस्थित असलेल्या इंग्रज डॉक्टरशी व्यक्त केली कारण दोन वर्षांपूर्वी शिंद्यांच्या कैदेत असताना त्यांना झालेली जखम यांच्या औषधोपचारामुळे बरी झाली होती. तेथे सर्व मानकरी एकत्रित बसलेले असताना अंबुजी उठले आणि डॉक्टरांच्या कडे जाऊन त्यांना मायेने आलिंगन दिले. त्यांनी सुर्जेराव यांची व डॉक्टरांची ओळख करून दिली आणि त्यांच्या वैद्यकीय उपचाराचे कौतुक केले.
      ग्वाल्हेरच्या किल्याची लढाई व मराठ्यांची शरणागती: गोहदचा राणा व इंग्रज सरदार पोफेम हे १७८०च्या फेब्रुवारीच्या सुमारास ग्वाल्हेरवर चालून गेले. गोहदचा राणा हा इंग्रजांना फितूर झाला होता. ग्वाल्हेरचा किल्ला हा एक मध्य भारतातील जबरदस्त मजबूत किल्ला होता व शिंदे सरकारांचे ते हृदय होते. त्या किल्ल्यावर महादजींचा विश्वासू रघुनाथ रामचंद्र हा किल्लेदार होता. त्याच्या दिमतीस अंबुजी इंगळे फौजेसह होता. त्या दोघांनी शौर्याने किल्ला लढविला. परंतु गोहदच्या राण्याकडील माणसाने किल्ल्यावर जाण्याची चोरवाट इंग्रजांना दाखवली. त्यामुळे किल्ला हातातून गेला. किल्लेदार ठार झाला तर त्याच्या बायकोने मुलास मारून आत्महत्या केली. ४ ऑगस्ट १७८० ला अंबुजीनी किल्ला इंग्रजांच्या हवाली केला. तो उज्जैन येथे महादजींना भेटायला गेला, तेव्हा महादजींनी किल्ला सोडून दिला म्हणून अंबुजीची चांगलीच कानउघडणी केली होती.
      अंबुजी इंगळे यांचा विविध लढायातील सहभाग: १७८० -८१ मध्ये मराठे व इंग्रजांचे युद्ध निकरावर आले होते. या युद्धात अंबुजी इंगळे हा महादजींच्या बाजूने लढत होता असे आढळते. त्यांच्या सोबत शिंद्यानी बळवंतराव धोंडदेव याना पाठविले होते. इंग्रज ग्वाल्हेर जिंकून शिपरीस पोचले तेव्हा त्यांना तोंड द्यायला महादजींनी अंबुजी इंगळे यास रवाना केले होते.महेश्वर मधून अहिल्याबाईंनी अंबुजीचे वडील त्र्यंबकजी याना ससैन्य पाठवले होते. याचा अर्थ इंग्रजांविरुद्ध पितापुत्र वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी लढत होते.
      ७मार्च१७८१च्या सुमारास महादजीने इंग्रज सेनापती कॉमक याला धडा शिकवून माघार घ्यायला लावली. १ जुलै १७८१ मध्ये शिप्राजवळ महादजी व इंग्रज सरदार कर्नल म्यूर यांची लढाई निकाली होऊन म्यूरचा पूर्ण पराभव झाला. या लढाईत अंबुजी हजर होता. या संघर्षात इंग्रजांची रसद आणणारे बैल व इतर सामान रात्री छापा घालून लुटण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. पुढे १नोव्हेंबर१७८४ रोजी आग्ऱ्यानजीक महंमद बेग हमदानी याने झैनुलबिद्दीन कडून आफराबासिया खान याचा खून घडवून आणला. या राजकारणात व हाणामारीत अंबुजी इंगळे महादजीकडून त्यानंतरच्या बंदोबस्ताच्या कामात कृतिशील होता.
      अंबूजींच्या खऱ्या कारकिर्दीची सुरुवात महादजींनी त्यांना दिल्लीच्या उत्तरेस २८महालांची फौजदारी दिली तेथपासून सुरु होते. हे सर्व महाल दिल्लीच्या उत्तरेस सोनपतजवळ होते. अंबुजी इंगळे यांची त्यावेळी दिलेली मुख्य जबाबदारी म्हणजे सम्राट पातशहा दिल्लीपासून दूर आग्रा येथे असताना त्याच्या अनुपस्थितीत शिखांच्या आक्रमणापासून दिल्लीचे रक्षण करणे हे होते.नंतर अंबुजीनी महादजी यांच्या सांगण्यावरून दिल्लीचा कारभार तेव्हाचा दिल्लीचा दिवाण अफराबसीयाखान यांच्याकडून ताब्यात घेतला. तसेच लहान लहान सरंजामांचे बंड त्यांनी मोडून काढले. हे छोटे सरंजाम मराठ्यांच्या विरुद्ध होते आणि ब्रिटिशांच्या मदतीने उठाव करण्याच्या तयारीत होते. त्यापैकी राघोगडचा राजा(मध्य प्रदेशातील गुणा) बळवंतसिंग व त्याचा मुलगा जयसिंग हे प्रमुख होते. या दोघांनी महादजी विरुद्ध उठाव केला आणि त्यावेळेस महादजींनी आपला इमानदार सरदार अंबुजी यांस त्यांचा नायनाट करण्यास पाठवले होते. अम्बुजी यांनी यशस्वीपणे त्या दोन बंडखोरांचा पराभव करून त्यांना कैद केले व त्यांची मालमत्ता जप्त केली. अंबुजीनी बळवंतसिंग यांस ग्वाल्हेरच्या किल्ल्यात बंदिवासात ठेवले.
      फेब्रुवारी १७८७च्या सुमारास अंबुजीना अजून एक महत्वाची जबाबदारी दिली गेली, ती म्हणजे लाहोर व पानिपत येथे एकमेकाविरुद्ध उठाव करणाऱ्या शिखांच्या बंदोबस्ताची!अंबुजीनी या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावत मार्च१७८७च्या शेवटास शिखांच्या भांडणाऱ्या दोन्ही गटात समझौता घडवून आणला. या कामात माचेरीच्या महाराव प्रतापसिंग यांची मध्यस्थ म्हणून मदत झाली. महाराव प्रतापसिंग हा शिंखांच्या बरोबर या पूर्वीच संपर्कात होता व शिखांनी महादजींना सामील होऊन सर्वानी मिळून तुर्कांना हाकलून देण्याचा बेत करीत होता. तसेच लखनौच्या नबाबाकडून, दिल्लीच्या बादशहाकडून, जयपूर व जोधपूरच्या राण्यांकडून प्रदेश जिंकून घेऊन राज्यविस्ताराच्या प्रयत्नात होता. २७ते३१मार्च१७८७ च्या दरम्यान राव प्रतापसिंग व अंबुजी दोघे दिल्लीच्या उत्तरेस १३ मैलावर असलेल्या भक्तावरपूर कूच करून गेले. तेथे त्यांनी दुफळी असलेल्या शीख सरदारांशी ३१मार्च रोजी तह करून दिला.ता तहान्वये अंबुजीनी शिखांना वेगळा 'राखी' नामक सारा गोळा कार्यास मज्जाव करून,त्या बदल्यात मराठे व शिखांनी एकत्र मिळून कर गोळा करावा व त्यातही १/३ वाटा शिखांना व २/३ मराठ्यांना मिळावा असे ठरले.
      अंबूजींचे राजस्थानमधील यश: अंबुजीना इंगळे यांना राजस्थानात प्रचंड यश मिळाले व तेथे त्यांच्या आयुष्याचा राजकीय व लष्करी कर्तृत्वाचा सुवर्णकाळ बघायला मिळाला. अंबुजीच्या कर्तृत्वाबद्दल अल्वरच्या रावराजाने अंबुजी इंगळे यांचा मानसन्मान केला व त्यांना राज्यांतील महत्वाचे 'किताब' दिले. त्यावेळी सन्मानाची वस्त्रे, एक हत्ती व दोन रुबाबदार घोडे वस्त्रे त्यांच्या लष्करी यशाबद्दल त्यांना भेट देण्यात आले.कोटा येथील एक मुत्सद्दी झाला झालीमसिंग यांचा राजस्थानच्या राजकारणात मोठा प्रभाव होता. अंबुजी इंगळे यांचे त्यांच्यासंगे सौहार्दाचे संबंध होते कारण त्यांच्या वडिलांनी त्रिंबकजी इंगळे यांनी भूतकाळात एका लढाईत झालीमसिंग यांचे प्राण वाचवले होते.सिप्रा येथील लढाईत झालीमसिंग हे जखमी होऊन त्रिंबकजी यांच्या हातात कैदी म्हणून सापडले होते. अशा अवस्थेत त्रिम्बकजी यांनी झालीमसिंग यांचे आदरतिथ्य करून त्यांची योग्य अशी काळजी घेतली होती. येथे एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल ती म्हणजे १७८९मध्ये झालीमसिंगाच्या बायकोने त्रिंबकजीना भाऊ मानून पतीच्या रक्षणाकरिता राखी पाठवली होती.झालीमसिंगच्या सुटकेसाठी अंबुजीनी महादजींना आपल्या पत्नीकडून राखी पाठवली,कारण महादजींना ती आपला मानलेला भाऊ समजत असे. अशा कारणाने झालीमसिंग हा नेहमीच इंगळे घराण्याबद्दल कृतज्ञ राहिला. शिंद्यांचा प्रतिनिधी म्हणून अंबुजी मेवाड प्रातांचा कारभार पाहत असत . अंबूजींची मेवाडचा कारभारी म्हणून काढलेली ८ वर्षे त्यांच्या राजकीय व प्रशासकीय सेवेचा उत्तम काळ होता असे म्हणता येईल. मेवाडमध्ये त्यावेळेस दोन प्रमुख गट होते, ते म्हणजे शेखावत व चुडावत,जे त्या प्रांतातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते.अंबुजीनी त्या दोघांची बंडे मोडून काढली व शेखावतांकडून ८लाख रुपये व चुडावातकडून १३लाख रुपये खंडणीच्या स्वरूपात दंड वसूल केला. मेवाडच्या राण्याची गादी अंबुजीच्या लष्करी सामर्थ्यामुळे सुरक्षित होती हे मेवाडच्या राण्याला समजले होते. म्हणून मेवाडच्या राण्याने आपल्या मंत्र्यांतर्फे अंबुजीशी एक वेगळा तह केला व त्या तहानुसार अंबुजीच्या लष्करी सेवांसाठी वर्षाला ८ लाख रुपये देण्याचे कबूल केले. या प्रकारच्या अनेक कामामुळे अंबुजीकडे संपत्तीचा ओघ एव्हढा वाढत होता की त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी ८ लाख रुपयांचे दागिने करणे त्याला सहज शक्य झाले. अंबुजीनी नंतर बंडखोराकडून दिल्लीच्या उत्तरेस जहाजगड (जॉर्जगड) जिंकून ताब्यात घेतला. अंबुजी त्या काळात एव्हढा प्रबळ झाला की ऑक्टोबर१७९६ मध्ये तो एक महादजीचा सामान्य चाकर न राहता सर्व मांडलिक संस्थानाचा ताबेदार बनला. पुणे रेसिडेन्सी पत्रव्यवहारात म्हंटले आहे की अंबुजीचे सामर्थ्य महादजींच्या तोडीस तोड होते आणि संपत्ती शिंद्यांच्या बरोबरीची होती. महादजीच्या मृत्यूनंतर मात्र दौलतरावांच्या कारकिर्दीत होळकरांनी शिंद्यांशी गुप्त समझौता करून अंबुजी वर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली व त्यांच्याकडून भूतकाळातील वसुलीच्या रकमेपैकी ६५लाख रुपयांची मागणी केली. इतिहासकार टॉडच्या म्हणण्यानुसार या वेळेस अंबुजीकडून ५५लाख रुपये उकळण्यात आले. वसुलीचा सारा जमा करण्यासाठी अंबुजीला त्याच्या विनंतीवरून अमीर खान व बापूजी शिंदे यांच्या सोबत पैसे जमा करण्यासाठी कोट्यास जाण्याची परवानगी देण्यात आली होती. एव्हढे करून अंबुजीने त्याला मागणी केलेल्या रकमेच्या अर्धा हिस्सा देण्यात यश मिळवले.
      राजस्थानमधील अंबुजी इंगळे यांच्या कारभाराचा आढावा: मेवाड येथील अंबुजीच्या कारभाराबद्दल इतिहासकारांत वेगवेगळे विचार प्रवाह आहेत. गौरीशंकर ओझा यांच्या मते महादजींनी अंबुजी यांची नेमणूक आपला प्रतिनिधी म्हणून केली परंतु अंबुजी दिवसेंदिवस शक्तिशाली होत गेला की स्वतःला मालक समजू लागला व आपणास राजस्थानचा कर्ताकरविता भासवु लागला.जेम्स टॉडच्या मते अम्बुजीने त्याच्या आठ वर्षाच्या कारकिर्दीत निर्विवादपणे मेवाड राज्याचा सारा वाढवला व त्याने एव्हढी संपत्ती जमा केली की उत्तर हिंदुस्थानातील एक स्वतंत्र राजा म्हणून त्याची ओळख होऊ लागली. झाला झालीमसिंग याला स्थानिक सल्लागार ठेऊन अंबुजीने राजस्थानला खूप वर्षे हवी असलेली उत्तम प्रशासकीय पद्धती दिली. राजा अंबुजीने मेवाडच्या लोकांना शांतता व सुखकारक दिवस दिले ज्या गोष्टीसाठी तेथील प्रजा अनेक वर्षे आसुसली होती. अंबुजीच्या उत्कृष्ट कारभाराची पावती म्हणजे त्याने त्या प्रांताचे उत्पन्न प्रतिवर्षी ५०लाख रुपयांपर्यंत वाढले.
      अंबुजीचे दौलतराव शिंद्याबरोबरचे संबंध: महादजीचा मृत्यू पुण्यात फेबुवारी १७९४ मध्ये झाला व आपल्या मागे त्यांनी अफाट प्रदेश व संपत्ती सोडली होती. महादजीना पुत्र नसल्याने त्यांनी हयात असतानाच दौलतराव या १४ वर्षाच्या कोवळ्या मुलास आपला वारस नेमला होता. त्यानंतर लगेच सवाई माधवराव पेशव्याचा ७ऑक्टोबर १७९५मध्ये मृत्यू झाल्याने दौलतरावचे लक्ष जास्त करून पुण्याच्या वारसाहक्काच्या घडामोडीवर केंद्रित झाले.त्यामुळे दौलतराव शिंदे याना अनेक वर्षे राजस्थानकडे बघायला वेळच झाला नाही. त्या योगे तेथील मराठे राज्यकारभार हाकायचा पूर्ण जबाबदारी अंबुजी इंगळे यांच्यावर येऊन पडली. दौलतरावांनी आपल्या राज्याच्या पूर्वेकडील झाँसी सकट प्रदेशाची जबाबदारीसुद्धा अंबुजीवर सोपवली.
      महादजींच्या निधनानंतर त्यांच्या विधवा स्त्रियांत सर्वख्यात भांडणे व वादविवाद सुरु झाले कारण दौलतरावाच्या नेमणुकीला त्यांचा कट्टर विरोध होता. कारण दौलतरावांकडे महादजीची ना हुशारी होती ना परिपक्वता! त्यामुळे नंतरच्या काळात त्याला महादजीने जसे आपल्या सरदारांशी सौहार्दाचे संबंध ठेवले होते तसे ठेवता आले नाहीत. दौलतरावांकडे महादजींची लष्करी ताकद नव्हती व राज्यकारभाराची कुवत नव्हती त्यामुळे तो सर्जेराव घाटग्यांच्या हातातील एक बाहुला झाला व त्याच्या सुंदर पत्नीच्या बायजाबाईच्या सल्ल्याने कारभार हाकू लागला. महादजींच्या विधवा पत्नींच्या लढाईत अंबुजी, बाळोजी व खंडूजी यांनी दौलतरावची बाजू घेतली. दौलतरावाच्या आज्ञेनुसार अंबुजी इंगळे याने उत्तरेकडे प्रतिपक्षाला काबूत ठेवले व अशा तऱ्हेने अंबुजी दौलतरावाच्या मर्जीतील खास माणूस झाला. विधवांच्या लढाईत नरवरच्या राजाने विधवांचा पक्ष घेतल्याने तो दौलतरावाच्या शत्रुपक्षात गेला व त्याने शिंद्यांचा दुसरा महत्वाचा सरदार लखबादादा याला आश्रय दिला. लखबादादा जो उत्तरेकडील मराठ्यांचा प्रतिनिधी होता त्याने एक दिवशी अचानक नरवरच्या राजावर हल्ला चढवला व त्याने नरवर जिंकून घेतले व किल्ल्याला वेढा घातला. परंतु दैवाचा खेळ किती विचित्र असतो कारण त्याच नरवरच्या राजाचा लखबादादाला आश्रय घ्यावा लागला कारण अंबुजी इंगळे त्याचे भांडण झाले. अंबुजी इंगळे यास नरवरचा समाचार घेण्यास पाठवण्यात आले, त्याने नरवरच्या राजाचा व लखबादादाचा पराभव केला व आपला बंधू खंडेराव इंगळे याला नरवरची सुभेदारी दिली. त्यावेळेस दौलतरावाने संपूर्ण उत्तरेतील जहागिरीचा मुख्य म्हणून अंबुजीची नेमणूक केली. अंबुजी इंगळे व सर्जेराव घाटगे दोघांनी मिळून शिंदे व होळकर यांची इंग्रजविरद्ध युती करण्याचा विफल प्रयत्न केला.
      दौलतराव याला राजकारणातील धागेदोरे व गुंतागुंत माहिती नसल्याने तो हळूहळू अंबुजीच्या वाढत्या सत्तेबद्दल सांशक होऊ लागला. खरे तर दुर्दैवाने दौलतरावास अंबुजीचा त्या काळात उपयोग करून घेता आला नाही. जेव्हा पैशाची चणचण भासू लागली तेव्हा दौलतरावाने होळकरांना अंबुजीचा प्रदेश लुटण्यास परवानगी दिली,यामागे एक अट अशी होती ती म्हणजे लुटीतील निम्मा वाटा दौलतरावास मिळाला पाहिजे. अंबुजीकडील संपत्तीवर डोळा ठेवून दौलतरावाने एका दगडात दोन पक्षी मारायचा प्रयत्न केला. परंतु यात फायदा कोणाचा झाला असेल तर तो इंग्रजांचा कारण अंबुजी हा होळकरांचा हाडवैरी बनला कारण यापुढे होळकर व शिंदे यांच्यात कधीही एकी होऊ शकणार नव्हती. तथापि दौलतरावाने अंबुजीस काही महत्वाची कार्ये सोपवली.
      इंग्रजांबरोबर तह: अंबुजी इंगळे याने महादजीचा प्रधान म्हणून राजस्थानात बरेच नाव व संपत्ती कमावली होती. जेव्हा दौलतरावाने अंबुजीकडे जमा केलेल्या सार्याबद्दल ४७ लाख रुपयांची मागणी केली तेव्हा अंबुजीने आपला वकील लॉर्ड वेलस्ली याला गुप्तपणे भेटायला फतेहगड येथे १८०१मध्ये पाठवला. वकिलातर्फे त्याने स्वतःला कर्नल कॉलिन याजकडे कंपनीकडे आसरा देण्याची विनंती केली. १८०३ मध्ये त्याने आपल्या मालकाशी म्हणजे दौलतराव शिंद्यांशी बंड पुकारून वेलस्लीबरोबर बोलणी चालू ठेवली. अंबुजीचा मुक्काम त्यावेळेस ग्वाल्हेरला होता आणि इंग्रजांचा झपाट्याने होणार राज्यविस्तार व स्वयं महत्वाकांक्षेपायी त्याने लासवारीच्या लढाईपूर्वी इंग्रजांशी समझोता केला ज्यायोगे इंग्रजांनी त्याला मारवार,शिवपुरी,कुंच,सबळगड,बिजयपूर,कोलारस देण्याचे मान्य केले.हिंदुस्थानच्या इतिहासात हा तह इंग्रज व राजा अंबुजी यांच्यातील एक मैत्री व सलोख्याचा तह म्हणून प्रसिद्ध पावला. त्या तहातील कलमानुसार राजा अंबुजी यांनी ग्वाल्हेरचा किल्ला इंग्रजांना दिला व त्याच्या आजूबाजूचे परगणे अंबुजीच्या ताब्यात होते ते सुद्धा इंग्रजांना बहाल केले. इंग्रजांनी त्या बदल्यात नरवरचा किल्ला आणि तेरा लाख उत्पन्नाचा बाजूचा प्रदेश राजा अंबुजीला देऊन टाकला. हे सारे प्रदेश त्या समयी राजा अंबुजीकडे विना उत्पन्नाचे होते. १६ डिसेंबर १८०३ रोजी जनरल गेरार्ड लेक बरोबर अकबराबाद परगणे सरहिंद येथे तहावर शिक्कामोर्तब झाले. हा तह इंग्रजांनी भविष्यात काही कारणांनी अमान्य केला तरी त्यावेळचे राजा अंबुजीचे इंग्रजांच्या दृष्टीतून हिंदुस्थानच्या राजकारणातील महत्व दिसून येते. या तहाचे महत्व एव्हढ्यासाठी आहे कारण या तहामुळे दौलतराव शिंदे यांचे वर्चस्व हिंदुस्थानच्या उत्तर भागातून नाहीसे झाले.
      राजा अंबुजीचे शेवटचे दिवस: वर उल्लेखलेल्या तहाच्या दुसऱ्या कलमानुसार अंबुजी इंगळे याने ग्वाल्हेरचा किल्ला इंग्रजांना हस्तांतरित करणे बंधनकारक होते परंतु अंबुजीला ते काही कारणाने जमले नाही. त्यामुळे अंबुजीची स्थिती दोन्ही घराचा पाहुणा उपाशी अशी झाली. इंग्रजांचा त्याच्यावरचा विश्वास उडाला तर दौलतराव शिंद्यांची, त्याच्या मालकाची त्याने गैरमर्जी ओढवून घेतली. सन१८०९मध्ये दौलतराव याला अंबुजीचा राग आल्याने त्याने अंबुजीला पोहरी (शिवपुरीजवळ) येथून हाकलून देण्यासाठी आपला सरदार याकूबखान याला रवाना केले.याप्रकारे एका मराठा सरदाराची वैभवशाली कारकिर्द आता उतरणीला लागली.
      इतिहासकार बौटन याच्या लेखात अंबुजीच्या अखेरच्या काळाचे वर्णन आले आहे. बौटनचा इतिहास हा इतिहासातील कदाचित हा एकमेव अधिकृत स्रोत असेल ज्यामध्ये अंबुजीच्या वैभवशाली जीवनाचे वर्णन आले असेल. त्यामध्ये तो म्हणतो की बिचारा वयोवृद्ध राजा अंबुजी इंगळे हा मृत्युपंथाला लागला आहे. काही दिवस आधी तो आजाराने ग्रासलेला होता आणि त्याने पूर्वीचा इंग्रज डॉक्टर याना परत येऊन भेटण्याची विनंती केली. आपल्या लष्करात मोडकळीस आलेल्या शामियानामध्ये तो अतिशय दयनीय अवस्थेत पहुडला होता. त्याच्याभोवती शुश्रूषा करणारे मोजकेच नोकरचाकर होते. दोन दिवसाने अंबुजी तेथून सकाळीच बिआस नदीच्या काठी गेला होता असे कळले. कदाचित अंशतः हवा बदल म्हणून व आपल्या पत्नीस व मुलांना भेटायला तो गेला असेल. त्याच्या वृद्ध वयामध्ये राजकारणाची धामधूम व इतर भानगडी यांचा त्रास होऊन त्याचा शेवटचा दिवस जवळ येऊन ठेपल्यास नवल नव्हते. अशा प्रकारे ५ मे १८०९ रोजी सकाळच्या वेळी राजा अंबुजीचा देहांत त्याच्या लष्करी तळापासून जवळच बुगेरा येथे झाला. तथापि पुणे रेसिडेन्सी पत्र व्यवहार मध्ये ४मेच्या रात्री मरण पावला असे म्हंटले आहे. आपल्या मागे त्याने प्रचंड संपत्ती सोडल्याचे म्हंटले आहे, एके ठिकाणी त्याच्यामागे ३ कोटी रुपये होते असे नमूद केलेले आहे.त्याची राजकीय कारकीर्द व त्याच्या हातातील अनेक वर्षे असलेली सत्ता पाहता हा आकडा खरा देखील असू शकतो. त्याच्या मृत्युशय्येपाशी त्याचा एक पुत्र दाजी हा हजर होता, अंबुजीची जहागिरी मुलाला देण्यासाठी त्याने ४ ते ५ लाख रुपये नजर करावेत अशी दौलतरावांची अपेक्षा होती.
      अंबुजी इंगळे यांच्या कारकिर्दीचा वस्तुनिष्ठ आढावा: राजा अंबुजी इंगळे हा पेशाने हाडाचा सैनिक होता व शेवट पर्यंत तो महादजींशी व नंतर दौलतरावांशी एकनिष्ठ राहिला. त्याचे मन दुर्दम्य इच्छाशक्तीने भरलेले होते व काही प्रकारची धोकेबाजी त्याच्या स्वभावात होती.१९व्या शतकाच्या पहिल्या दशकात अंबुजी इंगळेंचे नाव बरेच गाजले आपले वडील त्रिंबकजी यांच्याकडून त्यांना शौर्य व मुत्सद्देगिरी हे गुण त्यांना आपोआप मिळाले होते. आपल्या इतर भावासोबत अंबुजी व त्याचे वडील यांनी अहमद शहा अब्दाली विरुद्ध पानिपतच्या लढाईत भाग घेतला होता. अंबुजीने आपली कारकीर्द एक सामान्य सुभेदार सुरु केली व शेवटी मोठ्या प्रांताचा मुख्य झाला. त्याच्या आठ वर्षाच्या मेवाडच्या कारकिर्दीत त्याने त्याकाळातील त्याच्या बरोबरीच्या इतर सुभेदारांच्या तुलनेत प्रचंड पैसा जमा केला. झालवाड जहागिरीचा प्रमुख अतिशय हुशार व धोरणी असा झालीमसिंग हा त्याचा सल्लागार होता. त्यांच्यातील मैत्रीचा अंबुजीला फायदा झाला. अंबुजीने तरुण इंग्रज लष्करी सेनापती जोसेफ हार्ले बेलासिस याची नेमणूक केली. जोसेफच्या हुशारीने अंबुजीने कवायती फौजेच्या पायदळाच्या चार बटालियन उभ्या केल्या. कर्नल जेम्स हाफर्ड याची पण अंबुजीला मदत झाली. तो अंबुजीकडे १७९०मध्ये नोकरीस लागला व त्याने तोफखान्याचे एक ब्रिगेड तयार केली. अठराव्या शतकाच्या अखेरीस व एकोणिसाव्या शतकाचा पहिल्या दशकात अंबुजी इंगळे हा निर्विवाद त्याकाळातील एक हुशार व चलाख मराठा सरदार होता. एका सामान्य सुभेदारापासून तो आपल्या शौर्याने, चिकाटीने, मुत्सद्देगिरीने व कामगिरीने या हुद्द्याला पोचला त्याला सलाम केला पाहिजे.
      संदर्भ: Ambaji Inglia - An Historical Saga Unearthed या लेखाचे मुक्त भाषांतर, मराठी रियासत खंड ६, सरदेसाई ,पुणे रेसिडेन्सी पत्रव्यवहार खंड ८, ऑक्टोबर १७९६ पत्र, संकलन व लेखन: प्रमोद करजगी


    5. [S26]
      केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/., https://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-56/1367-2012-10-20-04-56-52.
      अंबाजी इंगळे - शिंद्यांचा एक सरदार. याच्या बापाचें नांव त्रिंबकजी. इ. स. १७८४ सालीं महादजी पातशाहीचा बंदोबस्त करण्यासाठीं दिल्लींकडे आला तेव्हां हा उत्तर हिंदुस्थानांत त्याजबरोबर होता. या प्रसंगी त्याच्या हातून कित्येक जबाबदारीचीं कामें घडलीं. उदाहरणार्थ याच सालच्या जुलै- आगस्ट महिन्यांत अंबाजी इंगळे व शीख सरदार याचा तह झाला; व पुढे ता. २ नोव्हेंबर रोजीं अफरासियावखानाचा खून झाला तेव्हां यास फौजेसुद्धां मुसुलमानी लष्करांत ठेवलें होतें. पण अंबाजीकडे केवळ लष्कराचा कारभारच सोंपविण्यांत येत होता असें नाहीं. १७८७ च्या आक्टोबर नोव्हेंबर (आश्विन) महिन्यांत महादजीनें खोडी पाटोडीहून गुलाम कादराच्या पारिपत्यास येऊं काय म्हणून पातशहास विचारण्यासाठी अंबाजीची वकील म्हणून नेमणूक केली होती.

      थोड्याच वर्षांनीं अंबाजीस याहून जास्त स्वतंत्रतेनें कारभार करण्याची संधि मिळाली. इ. स. १७९१ च्या सुमारास महादजीनें अंबाजीस उदेपूरच्या राण्याच्या विनंतीवरून त्याच्या राज्यांतील चोंडावत सरदारांचें बंड मोडण्यासाठीं कांहीं पलटणी देऊन पाठविलें. तेव्हां अंबाजीनें चोंडावतांचा मुख्य जो साळुंब्रा त्यास राण्याची माफी मागावायास लावून त्याजकडून राण्यास वीस लक्ष रुपये दंड देवविला; व राण्याची सत्ता प्रस्थापित करून बंडखोर सरदारांकडून त्याच्या जमिनी सोडविल्या. शिवाय त्यानें तोतया राण्यास कमलमीरांतून हांकून लावण्याचीहि राण्याची दुसरी एक कामगिरी बजाविलीत्र एवढ्या गोष्टी करावयास अंबाजीस दोन वर्षें लागलीं. याशिवाय मेवाडच्या राण्यास अंबाजीकडून आणखीहि कांहीं कामगिर्‍या करून घ्यावयाच्या होत्या. शिवाय मेवाडच्या राण्यास चोंडावत सरदारांचेंहि भय वाटत होतेंच. म्हणून त्यानें अंबाजीच्या सैन्याच्या खर्चाकरितां सालीना आठ लाख रूपये उत्पन्नाचा मुलूख तोडून देऊन त्यास मेवाडांत ठेवून घेतलें. अशा रीतीनें मेवाडच्या कारभाराचीं सर्व सूत्रें अंबाजीच्या हातीं येऊन तो आपणास मेवाडचा सुभेदार म्हणवूं लागला.

      इ. स. १७९५ सालच्या सुमारास अंबाजीची शिंद्यांचा प्रतिनिधि म्हणून उत्तरहिंदुस्थानांत नेमणूक झाली. तेव्हां अंबाजी गणेशपंत नामक आपल्या एका अधिकार्‍याकडे मेवाडचें काम सोंपवून उत्तरहिंदुस्थानांत गेला. अंबाजीचा धनी दौलतराव हा यावेळीं वयांत आलेला नसल्यामुळें प्रथम प्रथम अंबाजीच्या हातीं उत्तरहिंदुस्थानांत 'कर्तुमकर्तुं' सत्ता आली. पण लवकरच त्यास लखबादादा हा प्रतिस्पर्धी उत्पन्न झाला. अंबाजीचा अधिकारी गणेशपंत हा मेवाडांत आपल्या वर्तनानें लोकांस अगोदरच अप्रिय झाला होता. ही संधि साधून लखबादादानें राण्यास अंबाजीचें वर्चस्व झुगारून देण्याविषयीं गुप्तपणें उत्तेजन दिलें व स्वत: त्यास गणेशपंताविरूद्ध मदत करण्यासाठीं पुढें आला. अंबाजीच्या पक्षाच्या व राण्याच्या पक्षाच्या लोकांत कित्येक चकमकी होऊन त्यांपैकीं बहुतेकांत अंबाजीच्या पक्षाच्या लोकांचा पराजय होत गेला. अशा स्थितींत इ. स. १८०० च्या सुमारास हिंदुस्थानचा कारभार अंबाजीकडून काढून तो लखबाकडे सोंपविल्याचा शिंद्याचा हुकूम आला व त्यामुळें गणेशपंतास मेवाडमध्यें लखबाच्या ताब्यांत जे काय किल्ले व शहरें होतीं ती लखबाच्या स्वाधीन करून निघून यावें लागलें [भीमसिंह, उदेपूरचा राणा पहा.].

      इ. स. १८०३ च्या सप्टेंबर महिन्याच्या सुमारास अंबाजीनें आपल्या कारस्थानांनीं पेरॉन यास हुसकून लावून त्याची जहागीर व शिंद्याच्या सैन्याचें आधिपत्य मिळविलें. याच सुमारास शिंद्याची लखबादादावर खप्पा मर्जी होऊन लखबादादाच्या ऐवजीं अंबाजीचा भाऊ बाळाराव हा मेवाडांत गेला. तेथें बाळारावानें मेवाडच्या चोंडावत सरदारांकडून पैसा वसूल करण्याच्या कामीं इतका बेसुमार जुलूम केला कीं चोंडावतांनीं उलटून बाळारावास कैद केलें. तेव्हां बाळारावास कोट्याच्या जालीमसिंहाची दोस्ती कामीं पडलीं. अंबाजीच्या बापानें जालिमसिंह हा पूर्वी एकदां उज्जनीच्या लढाईंत जखमी होऊन मराठ्यांच्या हातीं लागला असतां त्याचा जीव वांचवून त्याची मुक्तता केली होती. हे उपकार आठवून या प्रंसगीं तो उदेपुरावर चाल करून आला व राण्याच्या सैन्याचा पराभव करून त्यानें बाळारावास बंधुमुक्त केले.

      इ. स. १८०३ मध्येंच शिंद्यांचें इंग्रजांशीं युद्ध झालें. यावेळीं अंबाजी इंगळे हा गोहद प्रांताचा मामलतदार होता. त्या युद्धांत इंग्रज उत्तर हिंदुस्थानांतील शिंद्यांचा मुलूख भराभर काबीज करीत चालले आहेत असें पाहून अंबाजी इंगळे हा शिंद्याविरुद्ध बंड केल्याचें मीष करून इंग्रजांस जाऊन मिळाला. व त्याच्यांशीं तह करून त्यानें गोदहच्या राण्याच्या मुलुखांतील कांहीं मुलूख स्वत:करितां मिळविला. पण शिंदे व इंग्रज यांच्या दरम्यान तह होतांच अंबाजी पुन्हां शिंद्याकडे गेला; व आपण आपल्या धन्याचा कोणत्या ना कोणत्या तरी रूपानें कांहीं मुलूख बचावण्याकरितांच केवळ इंग्रजांनां जाऊन मिळालों होतों असें सांगून त्यानें शिंद्याकडून आपल्या समयोचित वर्तणुकीबद्दल शाबासकी मिळविली. महादजीनें सन १७८४ सालीं गोहदच्या राण्यापासून त्याचा मुलूख जिंकून घेतला असल्यामुळें त्याला ग्वालेरचा किल्ला इंग्रजांस देण्याचा कांहींच हक्क नाहीं, हा मुद्दा स्वत: अंबाजीनेंच उकरून काढला होता असें ग्रांटडफ, अंबाजीच्या जांवयानें त्याला तोंडीं सांगितलेल्या माहितीवरून लिहितो. पुढील सालीं होळकर व इंग्रज यांच्यामध्यें युद्ध उपस्थित झालें. तेव्हां अंबाजीनें होळकराला मिळण्याविषयीं शिंद्यास सल्ला दिला होता असें म्हणतात.

      यानंतर शिंद्याची अंबाजीवर पुन्हां इतराजी झाली; व शिंद्याच्या अर्धवट संमतीनें यशवंतराव होळकरानें अंबाजीस (इ. स. १८०५ सालीं) कैद केलें. पण मागून होळकरानें आपल्या फौजेस देण्याकरितां अंबाजीपासून बराच पैसा घेऊन त्यास बंधमुक्त केलें. व सर्जेराव घाटग्यास काढून शिंद्याकडून त्यास दिवाणगिरी देवविली. अंबाजी हुषार असल्यामुळें आपल्या कार्यांत त्याजपासून कांहीं मदत होईल अशी होळकरास आशा वाटत होती परंतु अंबाजी हा होळकर व इंग्रज या दोघांसहि खूष ठेवूं इच्छित असल्यामुळें त्याचें वर्तन एकंदरींत धरसोडीचें राहिलें. अंबाजी हा इ. स. १८०९ च्या सुमारास मरण पावला. असें दिसतें (टॉड व ग्रांटडफ).





Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.